मुंबई ( प्रतिनिधी ) – आपण मंत्री नसतांनाही मतदारसंघात चांगली कामे केल्यामुळे मंत्री झाल्यास कामांना वेग येईल अशी लोकांना अपेक्षा असल्याने मला मंत्रीपद मिळावे यासाठी जनतेचाच दबाव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार किशोर पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मंत्रीपदावरून शिंदे गटात कोणतीही स्पर्धा नसून शिवसेनेचे ४० आणि अपक्ष ११ असे ५१ आमदार एकसंघ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. मंत्रीपदामुळे अंतर्गत कलह असल्याचा देखील त्यांनी इन्कार केला.
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, पाचोरा-भडगाव मतदारसंघात माझे काका दोनदा आमदार होते. तर मी स्वत: देखील येथून दुसर्यांदा निवडून आलो आहे. मंत्रीपद नसतांनाही मी मतदारसंघात खूप कामे केली आहेत. यामुळे मंत्रीपद मिळाले तर अजून प्रचंड गतीने विकास होईल अशी जनतेला अपेक्षा आहे. यामुळे मंत्रीपदासाठी जनतेचा मोठा दबाव असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मागणीचा नक्कीच विचार करतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.