जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील साईविहार कॉलनीत अज्ञात माथेफिरूंनी आज मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दोन कार पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला असून पत्राद्वारे १० लाखांची खंडणीची मागणी करण्यात आली आहे.
“निमखेडी शिवारातील साई विहार येथील रहिवाशी हरीश वरूडकर यांची कार (क्रमांक – एमएच २० डीजे ७३१६) व आनंद युवराज पाटील यांची कार (क्रमांक – एमएच १९ सीझेड ४४३०) या दोघांच्या कार घरासमोरील अंगणात लावलेल्या होत्या. बुधवार, दि. २९ जून रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूंनी पार्किंगला लावलेल्या दोन्ही कार पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वाहनांना आग लावून जाळपोळ करणाऱ्यांनी चिठ्ठी लिहून १० लाख रूपयांची मागणी केली आहे. चिठ्ठीच्या खाली सुलतान भाई गब्बर गँग असा उल्लेख केला आहे. गाडी पेटत असल्याचा वास आनंद पाटील यांना आला. त्यांनी बाहेर येवून पाहिले असता अंगणात उभी असलेली कार जळत होती. आरडाओरड नागरीकांच्या सहकार्याने ही आग विझविण्यात आली.
दोन दिवसात पैसे न दिल्यास कुटुंबियातील सदस्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे निमखेडी शिवारातील नागरीक भयभित झाले असून पोलीसांनी यावर त्वरीत कारवाई करून गुन्हेगारांना अटक करण्यात यावी. अशी मागणी केली जात आहे.