नवी दिल्ली (वृत्तसंथा) – चीनमध्ये थैमान घेतलेल्या कोरोना व्हायरसचा आता भारतातही प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे. भारतात आतापर्यंत २८ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. हर्षवर्धन म्हणाले कि, दिल्लीतील कोरोना पीडित ६६ लोकांच्या संपर्कात आला होता. आग्रा येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबातील ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर इटलीहून पर्यटनासाठी आलेल्या १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. या १५ जणांना आयटीबीपी कॅम्पमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच इराण सरकारने पाठिंबा दिल्यास आम्ही तिथे टेस्ट लॅब उभारून टेस्ट तिथे स्क्रिनिंग केल्यानंतर इराणमधील भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यात मदत होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरात ३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.