जळगाव ( प्रतिनिधी ) – पोलिस अधीक्षक बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर बाहेरच्या बाजुने अज्ञात लोकांनी पोलीस खात्याबद्दल आक्षेपार्ह शब्द लिहीले. ऑईल पेंट रंगाने हे वाक्य रंगवण्यात आले. रविवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.नंतर रामानंदनगर पोलिसांनी तातडीने हे वाक्य पुसून टाकले.
प्रशासनाबद्दल लोकांकडून अनेकदा राग व्यक्त होत असतो कोणी आंदोलन, निदर्शन करुन निषेध करतो. तर कुणी वरीष्ठांकडे तक्रार करुन न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतात . परंतु, जळगावात हा वेगळा प्रकार रविवारी घडला . चक्क पोलिस अधीक्षक बंगल्याच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर आक्षेपार्ह मजकुर लिहीलेला होता. तर याच्या शेजारीच ‘रिस्पेक्ट जलगॉन हिप-हॉप डीएसपी’ असेही लिहीले आहे. या दुसऱ्या वाक्याचा अर्थ कळत असला तरी लिहणाऱ्याचा उद्देश काय? ते स्पष्ट होत नाहीये.
रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह पथकाने तातडीने धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला हा मजकुर कापडाने झाकला. यानंतर त्यावर रंग मारुन मजकुर मिटवण्यात आला. या प्रकारामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली काव्यरत्नावली चौकाला लागुन पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक अशा वरीष्ठांची निवासस्थाने आहेत. दररोज शकडो नागरीक चौकात सायंकाळी फिरायला येतात. याच भागत यंत्रणेच्या विषयी आक्षेपार्ह लिहलेले असल्यामुळे मोठा अर्थ काढला जातो आहे.. काही टारगटांनी भिंतीवर थेट व्यवस्थेचा निषेध करीत व्यवस्थेला शिवीगाळ करणारी पोस्ट लिहिली आहे. काव्यरत्नावली चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्या टारगट तरुणांना शोधणे अवघड नसले तरी अशी प्रवृत्ती ठेचण्यासाठी पोलिसांना त्रास घ्यावा लागणार आहे.