जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील पिंप्राळा परिसरातील मनपा हद्दीतील सोनी नगर, सावखेडा येथे गेल्या दोन दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात रात्री 10 वाजेनंतर दर 10 मिनिटात वीज गुल होत असल्याने लहान चिमुकल्यासह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विजबत्ती गुल झाल्याने नागरिकांना उकाडा सहन करून शरीरातुन घामाचा धारा वाहत आहे. त्यातच डासांचा उपद्रव त्यामुळे सोनी नगरातील नागरिक त्रस्त झाले आहे.
विजेचा लपंडाव
दि.11 रोजी रात्री 10 वाजता वीज बंद झाली त्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटात आली. पुन्हा 11 वाजता गेली. दि.12 रोजी रात्री 12.30 वाजता आली. मग पुन्हा 1 वाजता गेली मग 2.30 वाजता आली पुन्हा पहाटे 5 वाजता गेली 6 वाजता आली दिनांक 11 ते 12 रोजी जणू काही विजेचा लपंडाव सुरू आहे की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला होता.
नंबर असतो व्यस्त-
नागरिक विजेबाबत विचारपूस करण्यासाठी पिंप्राळा महावितरणच्या कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क केला असता दूरध्वनी व्यस्तच दाखवत असतो. रात्रीचे कर्मचारी जाणून बुजून दुरध्वनी बाजूला उचलून ठेऊन देत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. मात्र या वारंवार वीजपुरवठा खंडित बाबत अधिकारी गंभीर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
सोनी नगरातील नागरिक नियमित वीजबिल भरून सुध्दा त्यांना वीजपुरवठा सुरळीतपणे मिळत नाही. जशी वीजपुरवठा खंडित झाली की नागरिकांचे फोन खणखणते मात्र रात्रीचे कर्मचारी वारंवार त्रास नको म्हणून जाणून बुजून दूरध्वनी उचलून बाजूला ठेऊन देतात आणि त्रस्त नागरिक वारंवार फोन लावतात तर तो व्यस्तच दाखवतो.मात्र वीजपुरवठा सुरू झाला की, लगेच फोन उचलला जातो अश्या प्रकारे नागरिकांशी हा लपंडावाचा खेळ सुरू असल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.