मुंबई (वृत्तसंस्था) – माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. दरम्यान त्यांनी राज्य सरकार माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी करत असल्याचा आरोप केला. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण करून पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप भाजपने राज्य सरकारवर केला. तसेच याप्रकरणी सरकारला जाब विचारावा अशी मागणी, फडणवीस यांनी राज्यपालांना केली. निवेदनात म्हटल्याप्रमाणे, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश परिस्थिती आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण केली असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करून त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलू नये, अशी स्थिती निर्माण केली जात असल्याचे भाजपने म्हटले आहे. यावेळी विनोद तावडेजी, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, मंगलप्रभात लोढाजी उपस्थित होते.