नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी सध्या देशव्यापी लॉक डाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आलाय. सरकारतर्फे लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये देशातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे व बाधित रुग्णांना शोधून कोरोनामुक्त करणे या दृष्टीने उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊन आवश्यक असलं तरी देशाच्या अर्थचक्राला यामुळं सध्या ब्रेक लागला असून या संकटसमयी समाजातील विविध संघटना कोरोनाविरोधातील लढ्याला पाठबळ देत आहेत. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी देखील भारत सरकारतर्फे कोरोनाविरोधातील लढ्यासाठी उभारलेल्या फंडामध्ये मदत करण्याचा निर्णय घेतलाय. देशभरातील आरबीआयचे कर्मचारी आपले एक अथवा त्याहून अधिक दिवसांचे वेतन पीएम केअर्स फंडामध्ये जमा करणार आहेत. याबतची माहिती स्वतः रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली असून आरबीआयततर्फे कर्मचाऱ्यांनी जमा केलेला ७.३० कोटी रुपयांचा निधी पीएम केअर्स फंडामध्ये जमा केला जातोय.