नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
काही असामाजिक तत्त्वांनी केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सेक्युरिटी बॅरिअर तोडले आहेत. घराच्या गेटवरील बूम बॅरिअरही तोडले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपच्या गुंडांनीच हा हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे. सिसोदिया यांनीही या हल्ल्याला भाजप जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. आपच्या या आरोपावर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.
भाजपच्या पोलिसांनी या गुंडांना रोखण्याऐवजी केजरीवालांच्या घरापर्यंत त्यांना घेऊन गेली, असा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे.
भाजप युवा मोर्चाची निदर्शने सुरू होती. आंदोलकांनी गोंधळ घातला. सीसीटीव्हीवरही हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर रंग फेकला. आम्ही 50 लोकांना ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर जमलेला जमाव पांगवण्यात आला असल्याचं दिल्ली नॉर्थ डीसीपींनी सांगितलं.
केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला नंतर आपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केजरीवाल सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. हे पहिल्यांदाच होत नाही. जेव्हा जेव्हा भाजप निरुत्तर होते, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून असे हल्ले होतात. हा लोकशाहीला धोका आहे. दिल्ली पोलीस आणि गृहमंत्रालयाने त्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राय यांनी केली आहे.