जळगाव ( प्रतिनिधी ) – अजिंठा चौफुली येथे मोटारसायकल चोरीच्या प्रयत्नांतील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. संशयित आरोपीकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. गौरव ऊर्फ कटप्पा राजू कुमावत (वय-२९ रा. दत्तनगर पहूर, ता. जामनेर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
पोनि प्रताप शिकारे यांना अजिंठा चौफुली येथे संशयित दुचाकी चोरीच्या प्रयत्नात संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सफौ आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी , किशोर पाटील, विकास सातदिवे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, मुकेश पाटील, चेतन सोनवणे यांच्या पथकाने १८ मार्च रोजी सकाळी तत्काळ घटनास्थळ गाठले. बनावट चावीचा वापर करत दुचाकी चोरीच्या प्रयत्नातील संशयित गौरव यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. १८ मार्च रोजी सायंकाळी संशयित गौरव यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.