जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरणच्या सवलतीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे संपूर्ण वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे आणि स्थानिक विद्युत यंत्रणेच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले. एरंडोल तालुक्यातील विखरण गावात झालेल्या ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते.
ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास ६६ टक्के सवलत दिली जात आहे. कृषी वीजबिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमदेखील माफ करण्यात येत आहे, असे हुमणे म्हणाले. थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शासनाने विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन महावितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन हुमणे यांनी केले. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे, कक्ष अभियंता लक्ष्मी माने यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे व या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना करून देण्यासाठी जिल्ह्यात विविध गावांत कृषी ग्राहकांच्या वीजबिल दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे. कृषी ग्राहकांच्या वीज बिल दुरुस्तीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करुन देयक दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येत आहे.
थकीत बिलांच्या भरण्यामधील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हा स्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या, योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासह स्थानिक वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला वेग मिळाला आहे.
जळगाव परिमंडलात आतापर्यंत १ लाख ८२ हजार ५८३ शेतकऱ्यांनी कृषिपंपाचे १८५ कोटी ३४ लाख रुपये वीजबिल भरून योजनेत सहभाग नोंदवला आहे. सुधारित थकबाकीमध्ये ५० टक्के माफी मिळविण्याची संधी केवळ ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे.