चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील बीडगाव येथील ३५ वर्षीय विवाहितने आपल्या दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी तिघांचे मृतदेह विहिरीतून काढून चोपडा उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, चोपडा तालुक्यातील बीडगाव येथील विनोद विक्रम बाविस्कर (कोळी) वय-४० हा तरूण वर्षा विनोद बाविस्कर(वय 35), मुलगी खुशी विनोद बाविस्कर, किर्ती विनोद बाविस्कर, मोनाली विनोद बाविस्कर यांच्यासह वास्तव्याला आहे. काल बुधवारी २ मार्च रोजी रात्री विनोद याचे आईवडील आणि भाऊ यांच्याशी पैश्यांच्या देवाणघेवाण यावरून वादविवाद झाला. यात संतापाच्या भरात विनोद बाविस्कर याने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.
पतीने विषारी औषध घेतल्याचा पत्नी वर्षा बाविस्कर हिला प्रचंड धक्का बसला. या घटनेचा कोणताही विचार न करता वर्षा हिने दोन्ही मुली किर्ती आणि मोनाली यांना सोबत घेतले आणि बीडगाव शिवारातील गट क्रमांक २३४ मधील इकबाल शहादूर तडवी यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. सुदैवाने मोठी मुलगी खुशी ही मामाच्या घरी गेली असल्याने ती या घटनेपासून दूर राहील्याने बचावली आहे.
घटनेची माहिती मिळाताच अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून तिघांचा मृतदेह काढण्यात आला. शवविच्छेदन करण्यासाठी चोपडा उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे.