जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील मोबाईल नंबरचे केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्याचे सांगून महाबळ येथील एकाला १ लाख १६ हजार ४२८ रूपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवार, दि.२४ फेब्रुवारी रोजी रात्री राहुल अग्रवाल नामक व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेश भगवान गाजरे वय 55 राहणार महाबळ हे आपल्या पत्नी व मुलगा लोकेश यांच्यासह वास्तव्याला आहे. खाजगी वाटर सप्लायचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि.२१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नरेश गाजरे आणि त्यांचा मुलगा लोकेश हे घरी असताना, नरेश यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यात म्हटले होते की, ‘तुमच्या सिम कार्डचे केवायसी बाकी आहे, २४ तासाच्या आत कागदपत्र जमा करावे’ अशा सूचना देऊन एका नंबर वर कॉल करण्याचे सांगितले.
त्यानुसार नरेश गाजरे यांनी दिलेल्या नंबर वर कॉल केला असता समोरील व्यक्ती याने हिंदीत राहुल अग्रवाल वोडाफोन केअर मधून बोलत असल्याचे सांगितले. नंबर सुरू ठेवण्यासाठी १० रुपयाचा रिचार्ज करून केवायसी अपडेट करावी लागेल असे सांगितले. त्यानुसार नरेश यांचा साधा मोबाईल असल्याने त्यांनी मुलगा लोकेशला सांगितले. लोकेशने समोरील व्यक्तीच्या दिलेल्या माहितीप्रमाणे ‘यु मोबाईल ॲप’ डाऊनलोड केले आणि दिलेल्या ॲपमध्ये डेबिट कार्डची माहिती भरली. त्यावरून लोकेशने १० रुपयाचा रिचार्ज केला. त्यानंतर पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला आणि सांगितले की, तुम्हाला नंबर व्हेरिफाय करण्यासाठी ‘ एनीडेक्स, ऑटोमेटिक एसएमएस सेंड टू पीसी आणि केवायसी क्वीक डॉक्युमेंट” हे तीन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानुसार लोकेशने सांगितलेली तीनही ॲप डाऊनलोड करून दोघांच्या बॅंकेचे डिटेल्स भरले. डिटेल भरल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दोघांच्या बँक अकाउंटमधून अनुक्रमे लोकेशनच्या खात्यातून ६८ हजार २३४ तर नरेश गाजरे यांच्या खात्यातून ४८ हजार १८४ रुपये असे एकूण दोघांचे एकुण १ लाख १६ हजार ४२८ रुपये कमी झाल्याचे लक्षात आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दोघांनी तातडीने बँकेत धाव घेऊन दोन्ही अकाउंट बंद केलेत. यासंदर्भात नरेश गाजरे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुरुवार २४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता राहुल अग्रवाल नामक व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहे.