रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर शहरातून विना परवानगी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रावेर पोलीसांनी कारवाई केली असून वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर शहरातून मध्यरात्री विना परवानगी वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनिय माहिती फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार रावेर पोलिसांनी शहरातील बंडू चौकाकडे जाणाऱ्या राजे छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळ २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास पोलीसांनी नाकाबंदी केली असता वाळूने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २१] ०१५१) दिसून आल. त्याची चौकशी केली असता वाळू वाहतुकीबद्दल कुठलाही परवाना दिसून आला नाही. पोलीसांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर रावेर पोलीस ठाण्यात जमा केले आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक इरफान छबु तडवी (वय-३२) शेख दाऊद शेख शाकीर दोन्ही राहणार बंडू चौक रावेर यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल रशिद तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली, दोन ब्रास वाळू, पंचवीस हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण २ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास रावेर पोलीस कर्मचारी करीत आहे.