जळगाव ;- खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ५३वर पोहोचली आहे. जळगाव जिल्ह्यात रविवारी कोरोनाबाधीत चार नवीन रुग्ण आढळले. कोविड रुग्णालयात कोरोना संशयित चारही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. कोरोनाबाधीत रूग्णांपैकी तीन रूग्ण हे अमळनेरमधील असून एक रूग्ण हा भुसावळमधील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रूग्णांची एकूण संख्या १८ झाली आहे. तर चार रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रूग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्ह्यातील सर्वाधिक १० रुग्ण हे अमळनेरमधले आहेत. त्यामुळे अमळनेरमध्ये कोविड-19 रुग्णालय तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे.
धुळे
धुळे जिल्ह्यात रविवारी आणखी ३ रुग्णांचे अहवाल कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता २४ झाली आहे. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांच्या स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतर 15 रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 झाली आहे. रविवारी सापडलेले तिन्ही पॉझिटिव्ह रुग्ण हे धुळे शहरातील आहेत.
नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यात एकूण 11 रुग्ण कोरोना बाधीत आहेत. नंदुरबार, शहादा आणि अक्कलकुवा इथे कोरोना बाधीत रुग्ण वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
खान्देशात कोरोनाबाधीत रुग्ण – 53
धुळे – 24
जळगाव – 18
नंदुरबार – 11