पतीच्या वहिनीशी संबंधांचा जाब विचारल्याने जीवे मारल्याचा आरोप
पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील विष्णूनगर (गाळण) येथील 24 वर्षीय विवाहितेचा सासरच्यांनी गळा आवळून खून केला मनिषा चेतन राठोड (24, रा.विष्णू नगर, गाळण, ता.पाचोरा )असे मयत विवाहितेचे नाव आहे. या विवाहितेच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी पती चेतन राठोड, जेठ जयसिंग राठोड व दीर भगवान राठोड यांना अटक करण्यात आली.
कुंडाणे तांडा ( ता.धुळे ) येथील माहेर असलेल्या विवाहिता मनिषा हिचा शुक्रवारी रात्री खाटेवरच गळा आवळून खून करण्यात आला होता. सासरच्या मंडळींनी तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बतावणी केल्याने पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र मनिषा हिच्या गळ्यावर दोरी आवळल्याच्या व नखे लागल्याच्या खुना आढळून आल्याने तिचा भाऊ ज्ञानेश्वर पवार याने मनिषा हिचे शवविच्छेदन पाचोरा येथे न करता इनकॅमेरा जळगाव येथे करण्याची मागणी केल्याने शनिवारी दुपारी जळगाव जिल्हा रुग्णालयाचे डॉ.सोनार यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करुन पाचोरा पोलिसांना अहवाल सादर केला. त्या अहवालात मनिषा राठोड हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू नसुन तो दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने ज्ञानेश्वर पवार यांनी चेतन राठोड (पती), सयाबाई राठोड (जेठानी), जयसिंग राठोड (जेठ), सयाबाई राठोड (जेठानी) , भगवान राठोड (दिर) यांचेविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.
मनिषा राठोड हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. विवाह झाल्यानंतर दोन महिन्यांपासूनच विवाहात कमी हुंडा दिला व संसारउपयोगी भांडे दिले नाही. यावरुन तिला पतीसह सासरची मंडळी सतत त्रास देत असत. मनिषा हिचा पती चेतन याचे त्याची वहिनी सयाबाई राठोड हिच्याशी अनैतिक संबंध होते. ही बाब मनिषा हिने प्रत्यक्ष पाहुन पतीस विचारणा केल्याने त्याचा राग येवुन पती चेतन राठोड, जेठानी सयाबाई राठोड, जेठ जयसिंग राठोड, दिर भगवान राठोड यांनी मनिषा हिचा कायमचा काटा काढला , असा आरोप केला जात आहे . मनिषा हिस पतीपासून यश नावाचा मुलगा असुन त्यास चेतन याच्याकडे सोपविण्यात आले आहे. मनिषा हिच्यावर कुंडाणे तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास पो नि किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश चौबे हे करीत आहेत.