अमळनेर (तालुकाप्रतिनिधी)
अमळनेर शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या 12 व ग्रामीण 1 असे अमळनेर तालुक्यात एकूण संख्या 13 झाली असून जवळपास रोज त्यात वाढ होत आहे. याबाबत असे आढळून आले आहे की किराणा दुकान किंवा तत्सम वस्तूंचे दुकान यातून तसेच होम quarantine केलेल्या व्यक्तींकडून तोंडी व लेखी सूचना देऊन देखील शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात आलेले नाही त्यामुळे संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. रोज रुग्णांची संख्या वाढत असताना देखील नागरिक अद्यापही सामाजिक अंतर पाळत नाहीत. अमळनेर नगर परिषद व कृषी विभाग यांचे मार्फत किराणा व भाजीपाला यांची घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांना प्रशासनामार्फत कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी घराबाहेर पडू नये, जीवनावश्यक वस्तू घरपोच मागवाव्यात, सामाजिक अंतर पाळावे. करोना सदृश्य लक्षण दिसताच तात्काळ शासकीय रुग्णालयात जावे. तसेच यापुढे रुग्णांची संख्या वाढणार असल्याने अमळनेर शहरात covid care हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. तरी खाजगी डॉक्टर यांना देखील आवाहन करण्यात येते की, त्यांनी सदर हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यासाठी स्वतःहून पुढे यावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी अमळनेर सीमा आहिरे यांनी केले आहे.