मुंबई (वृत्तसंस्था ) –दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्या या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या प्रकरणात चिथावणी देणाऱ्या हिंदुस्थानी भाईला अटकही करण्यात आली. आता राज्य सरकारने या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होतील असं राज्य सरकारने म्हटलं आहे. बारावीची परीक्षा 4 ते 30 मार्च दरम्यान तर होणार आहे. 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत बारावीच्या प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा होतील.
दहावीच्या लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत ऑफलाइनच होणार आहेत. 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या दरम्यान दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा होतील असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. कोरोना काळात ऑनलाइन वर्ग भरत असल्याने विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटांचा अधिकचा कालावधी देण्यात येणार आहेत. 70 ते 100 मार्कांची परीक्षा असल्यास अर्धा तास जादा वेळ दिला जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू आहे. एका वर्गात जास्तीत जास्त 25 विद्यार्थी असतील त्यांना झिगझॅक पद्धतीने बसवण्यात येईल. दोन्ही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत.
दहावीसाठी १६ लाख २५ हजार ३११ आवेदन पत्रं मिळाली असून बारावीसाठी १४ लाख ७२ हजार ५६५ आवेदन पत्रं प्राप्त झाली आहेत. एकूण विद्यार्थ्यांची संख्या ३१ लाख असून इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी असताना ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य नसल्याचं यावेळी शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं. जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याचं नियोजन आहे. महत्वाचं म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना लस बंधनकारक नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
परीक्षेसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. यामुळे त्यांनी परीक्षा देताना परिचित वातावरण मिळेल आणि कमी प्रवास करावा लागेल असं शरद गोसावी यांनी सांगितलं आहे. कोरोनामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन ७५ टक्के अभ्याक्रमावर करण्यात आलं आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत. शाळा तिथं परीक्षा केंद्र असून बहिस्थ नाही तर शाळेतील शिक्षकच सुपरव्हायझर असतील.
परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. करोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणं दिसली तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. तसंच जवळच्या आरोग्य केंद्रामार्फेत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल.
दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावं लागणार आहे. तसंच १० मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल.