जळगाव (प्रतिनिधी ) – केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कोविडच्या आपत्तीतही शेतकर्यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा असून यातून देशाचा चौफेर विकास साधण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक दमदार पाऊल असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे आ. गिरीश महाजन यांनी स्वागत केले आहे. अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले की, सध्या देशावर कोविडच्या आपत्तीचे संकट असतांनाही शेतकरी, शेतमजूर, कामगार आदींसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय आज सरकारने जाहीर केले आहेत.
यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे केंद्र सरकारने कडधान्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले असून याचे मूल्य शेतकर्यांना थेट आपल्या खात्यामध्ये मिळणार आहेत. रासायनिक खतांनी मुक्त असणार्या शेतीला यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये आता नैसर्गिक शेती, झीरो बजेट शेती आदी विषयांचा समावेश करण्यात येणार असल्याची बाब अतिशय महत्वाची अशीच आहे. अर्थमंत्र्यांनी किसान ड्रोनच्या माध्यमातून आधुनीक शेतीसाठीची तरतूद देखील केलेली आहे. शेतीसोबत यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगारालाही प्राधान्य देण्यात आले असून वर्षभरात ६० लाख नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. तर लहान व मध्यम व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी देखील अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आधीच आत्मनिर्भर भारताचे व्हिजन मांडले असून निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात याचे प्रतिबिंब उमटल्याचे आ. गिरीश महाजन यांनी नमूद केले आहे. यात अर्थव्यवस्थेची प्रगती ही समाधानकारक राहणार असून यंदा झालेले विक्रमी जीएसटी संकलन हे याचेच प्रतीक आहे.
आ. महाजन पुढे म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे. महाराष्ट्राच्या वाटेलाही यात भरीव तरतुद करण्यात आलेली आहे. यात नागपूर व नाशिक येथील मेट्रोसाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आलेली आहे. तर भुसावळ-खरगपूर कॉरिडॉरमुळे माल वाहतुकीची सुविधा होणार असून याचा स्थानिक शेतकर्यांसह व्यापार्यांना लाभ होणार आहे.
आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की, प्रथमच शेती करता बॉस सारख्या आधुनिक उपक्रमाचा वापरामध्ये प्रोत्साहन दिलं शिक्षण क्षेत्रात भरीव तरतुदी करून अंगणवाडी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत जागतिक दर्जाच्या संस्थांना आमंत्रित करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण निर्मितीचा चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. साठ लाख नोकर्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलं उद्योगांना तसंच कर न चुकविणार्या यांना जर रेड पडली तर त्यामध्ये जप्त असलेले सर्व साहित्य कायमस्वरूपी जप्तीचा मोठ्या निर्णयाचे स्वागत आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच डिजिटल यंत्र भरीव तरतूद करून याच्या वापराला प्रोत्साहन दिलं तसेच ८० हजार नवीन घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून निर्मितीचे उद्दिष्ट या यावेळी ठेवण्यात आले असून प्रगतीसाठी या बाबी पूरक असल्याचेही आमदार गिरीश महाजन यांनी नमूद केले आहे.