जळगाव ( प्रतिनिधी ) – एकाच गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला कधी लग्नाचे आमिष दाखवत तर कधी धमकावत गावाजवळच्या शेतात नेऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात आज जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या गुन्ह्यातील पीडित १७ वर्षीय मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , आरोपी तरुण आणि ती एकाच गावातील रहिवाशी आहेत . त्यांची ओळख होती . ही तरुणी शिक्षणासाठी ये – जा करीत असताना आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवली . आधी लग्नाचे आमिष दाखवून तिला २ मित्रांच्या मदतीने घरातून सुरत येथे पळवून नेले होते त्यावेळी मुलीच्या आजोबांच्या तक्रारीवरून या आरोपीविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात सप्टेंबर , २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली होती . या गुन्ह्यातून जामिनावर मुक्त झाल्यानंतर पुन्हा आरोपीने पीडितेला लग्नाचे वचन देत जवळीक वाढवली . त्यानंतर तो तिला वेळच्यावेळी गावाजवळच्या शेतात नेऊन तिचे लैंगिक शोषण करीत होता . त्यासाठी तो या प्रकारची कुठेही वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता . वारंवार होत असलेल्या शरीरसंबंधांमुळे पीडित मुलगी गर्भवती झाली . शेकोटीवर पाय भाजल्याने जळगाव येथील एका रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तिने त्या रुग्णालयात बाळाला ( मुलीला ) जन्म दिला . ते बाळ पूर्ण वाढ झालेले नसल्याने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नवजात शिशु अति दक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते . सातव्या महिन्यात जन्माला आलेल्या व प्रकृती चिंताजनक असलेल्या या बाळाचे आज जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात निधन झाले . त्यानंतर या पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी मयूर रमेश कोळी ( वय २१ , रा – रोटवद , ता जामनेर ) याच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.