मुंबई (वृत्तसंस्था ): राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 7628वर पोहचला आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत 5049 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईकरांसाठी मे महिना अधिक कसोटीचा असून वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 70 हजारांवर पोहचण्याचा धक्कादायक अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या कोरोना टास्क फोर्सच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती मिळत आहे.
पंतप्रधान मोदींनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे. सध्या मुंबईत सात दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. 17 एप्रिलला 2120 असणारी रुग्णसंख्या आठवड्यानंतर 23 एप्रिल रोजी 4232 वर पोहचली आहे.
रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 7 दिवसांऐवजी तो 8, 9 किंवा 10 दिवसांवर नेण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील असल्याचं मनिषा म्हैसकर यांनी सांगितलंय. तसंच रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा हा कालावधी कमी होऊन 4 किंवा 5 दिवसांवर येऊ नये, याबाबतही काळजी घेतली जात असल्याचं त्या म्हणाल्या.
रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कंटेन्मेंट स्ट्रटेजीसाठी पालिकेतील 5 अधिकाऱ्यांची वेगळी टीम तयार करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता, अधिकाधिक वैद्यकीय सुविधांचं नियोजन करण्यासाठी पालिका अधिकारी आणि तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली 7 जणांची टीम गठीत करण्यात आल्याची माहिती, मुंबई महापालिकेच्या कोरोना टास्क फोर्सच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्या फेसबुक पोस्टद्वारे मिळाली आहे.राज्यात आतापर्यंत 323 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या मुंबईत 191 लोक दगावले आहेत.राज्यात 1076 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.