नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशातील आर्थिक गणित बिघडले आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार अनेक निर्णय घेत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावर माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारने हा निर्णय घेण्याची गरज नव्हती असे म्हणते आहे.
सध्याच्या घडीला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांबाबत मोदी सरकारने हा निर्णय घ्यायला नको होता, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने जुलैपर्यंत महागाई भत्ता स्थगित केल्याच्या निर्णयावर मनमोहन सिंग म्हणाले की, सरकारी कर्मचारी आणि सशस्त्र दलाशी संलग्नित कर्मचाऱ्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची कोणतीही गरज नव्हती. देशातील ५४ लाख सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महागाई भत्त्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२० पासून देय असलेली रक्कम आणि १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ पासून देय असलेली महागाई भत्त्याची अतिरिक्त देय रक्कमही येत्या काळात देण्यात येणार नाही, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.