पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील तामसवाडी येथे शेतामध्ये एका शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ जानेवारी रोजी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तामसवाडी गावामध्ये शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
गोपाळ रामदास बेलदार (वय ३५, रा.तामसवाडी) असे मयताचे नाव आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गोपाळचा भाऊ नंदलाल याने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खबरीमध्ये म्हटले आहे की, ११ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता गोपाळ बेलदार हे शेतामध्ये पाणी भरायला जातो असे सांगून गेले होते.
तासाभराने त्यांचा भाऊ नंदलाल बेलदार यांना फोन आला की, तुमच्या शेतात कोणीतरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसत आहे. त्यानुसार नंदलाल बेलदार हे आणखी दोघांना घेऊन पाहण्यासाठी गेले. त्या ठिकाणी त्यांचा भाऊ गोपाळ बेलदार हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी पारोळा पोलीस स्टेशनला कळविले. तसेच गोपाळ याला खाली उतरवून पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद केलेली आहे.