जळगाव (प्रतिनिधी) – अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी प्रमुख मागणी करणारे निवेदन जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तालुका अध्यक्ष दिगंबर चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे जळगाव तालुक्यातील उडीद,मूग,सोयाबीन, तीळ,कपाशी, या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले होते. त्यावेळी जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे असे निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रशासनातर्फे पंचनामे झाले. परंतु जळगाव तालुक्यातील कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे अद्याप पडलेले नाही.
यासाठी सोमवारी दि. १० जानेवारी रोजी जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, चार-पाच महिने होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. तरी आता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करावी अन्यथा प्रशासनाविरोधात जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी उपोषणास बसणार आहे. यावेळी तालुका उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रहमान पटेल, तालुका सरचिटणीस सुभाष बंगाळे, तालुका संघटन सचिव वसीम पिंजारी, तालुका कार्यकारिणी सदस्य संजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.