जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील ममुराबाद रोडवरील उस्मानिया पार्क येथे अज्ञात चोरट्यांनी सलग तीन घरे फोडून सोन्याचे दागिने, रोकड, लॅपटॉप आणि टॅबसह मुद्देमाल चोरी झाल्याचे सोमवारी १० जानेवारी रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
ममुराबाद रोडवरील उस्मानियॉ पार्क येथे रविवारी ९ जानेवारी मध्यरात्री सलग तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे सोमवारी १० जानेवारी सकाळी ७ वाजत उघडकीला आले आहे. यात फिरोज मोहम्मतद रफिक बागवान ( रा. उस्मानिया पार्क ) यांच्या घराच्या मागच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंड कपाट तोडून घरातील ४ तोळ्याच्या दोन सोन्याचे पोत, १० हजार रूपये रोख आणि पैशांचा गल्ला चोरून नेला, त्यांच्या घराच्या बाजूला मोहम्मद जुबेर शेख रफिक यांचे कादरिया ट्रेडर्स या दुकानात कोल्ड्रीग्जचे होलेसेल दुकान आहे. या ठिकाणी देखील अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत एक लॅपटॉप, मोबाईल टॅबलेट आणि ८० हजार रूपयांची रोकड चोरून नेला आहे. त्यानंतर याच घराच्या बाजूला राहणारे नावेद अहमद शेख नाशिर (वय-३४) हे कुटुंबियांसह नाशिक येथे लग्नाला घराला कुलूप लावून गेले होते. नावेद शेख यांच्या घराच्या मागचे लोखंडी दरवाजा चोरट्यांनी तोडून घरातील लोखंडी कपाट तोडले. यात कपाटातील सामान अस्तव्यस्त करून ८ ग्रॅम सोन्याची पोत, २ सोन्याच्या अंगठ्या, अर्धाकिलो चांदीचे दागिने आणि २० हजार रूपयांची रोकड लांबविला आहे.
तीन घरे फोडल्याचा प्रकार सोमवारी १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. चोरी झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पीएसआय सर्जेराव क्षिरसागर, पोहेकॉ. विजय निकुंभ, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. चोरी झाल्याचा पंचनामा करण्यात आला असून पुढील चौकशीचे काम सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.