पॅरीस ( वृत्तसंस्था ) – फ्रान्समध्ये ओमायक्रॉन पुन्हा धुमाकुळ घालू लागला असून तेथे दुसऱ्या लाटेसारखी गंभीर स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मंगळवारी एका दिवसात त्या देशात कोरोनाचे 2 लाख 71 हजार 686 रुग्ण आढळून आले आहेत. रूग्णालय आणि रूग्णालयातील यंत्रणांवर पुन्हा भार येऊ लागला आहे. या साऱ्या धास्तीतून फ्रान्समधील सामान्य जनजीवन पुन्हा ठप्प होत आहे.
नव्याने बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण या आठवड्यात दुप्पट झाले आहे. फ्रान्समध्ये एकूण आयसीयु बेड्सपैकी 72 टक्के बेडस ओमायक्रॉन बाधित रूग्णांनी भरले आहेत. या देशात लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण 77 टक्के असतानाही फ्रान्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याने चिंतेची स्थिती आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने आत्तापर्यंत 1 लाख 23 हजार लोकांचे बळी घेतले आहेत. फ्रान्स बरोबरच ब्रिटनमध्येही कोरोना धुमाकूळ घालू लागला आहे. तेथेही मंगळवारी एका दिवसांत कोरोनाचे 2 लाख 18 हजार 274 रुग्ण आढळून आले आहेत.