जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ज्या कुटुंबात दिव्यांग व्यक्ती असेल त्या कुटुंबाला दरमहा ३५ किलो स्वस्त धान्य दिले पाहिजे अद्यापही जिल्ह्यात आणि शहरात दरमहा ३५ किलो स्वस्त धान्य दिले जात नाही . या मागणीकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे.
दिव्यांग सेनेचे राज्य सचिव भरत जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ जानेवारी २०२१ पासून ज्या कुटुंबात दिव्यांग व्यक्ती असेल त्या कुटुंबाला दरमहा ३५ किलो स्वस्त धान्य दिल्या जावे असा आदेश राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने जारी केलेला आहे . मात्र अद्यापही जिल्ह्यात आणि शहरात दरमहा ३५ किलो स्वस्त धान्य दिले जात नाही . या मागणीसाठी आधी या संघटनेने ३ डिसेंबर, २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते त्यांनतर २९ डिसेंबर, २०२१ रोजी पुन्हा स्मरणपत्र दिले होते . मात्र या मागणीचा प्रशासनाने काहीच विचार केलेला नाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि स्वस्त धान्य दुकानदारांना त्यासाठी सूचना देणे अपेक्षित होते . आता या मागणीसाठी आजपासून संघटनेचे राज्य सचिव भरत जाधव , जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन , जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील , जिल्हा सचिव हितेश तायडे , मूकबधिर जिल्हाध्यक्ष भीमराव म्हस्के , शहर सचिव तौसिफ़ शहा , अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुत्ताजीम खान , सादिक पिंजारी , नितीन सूर्यवंशी , ज्ञानेश्वर पाटील आदींनी उपोषण सुरु केले आहे .