जळगाव ( प्रतिनिधी ) – रावेर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी सकाळी एका महिलेच्या ताब्यातून जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत जवळपास १ कोटी रुपये असल्याची माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी पत्रपरिषदेत दिली
रावेर शहरात अंदाजे ४५ वर्षे वयाची महिला लाल आणि हिरवे पट्टे असलेल्या पिशवीत टाकून ब्राऊन शुगर घेऊन येणार आहे आणि काही व्यक्तींशी व्यवहार करणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व रावेरचे पो नि कैलास नागरे यांनी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे ., चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचला होता . या कारवाईच्या वेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे व शासकिय पंच हजर झाल्यावर त्यांच्या समक्ष या महिलेची झडती घेण्यात आली .
स्थानिक गुन्हे शाखेच्या स पो नि योगिता नारखेडे , रावेरचे स पो नि शीतलकुमार नाईक , पो उ नि विशाल सोनवणे , स फौ युनूस शेख , स्थानिक गुन्हे शाखेचे हे कॉ मनोहर शिंदे , सुनील दामोदरे , लक्ष्मण पाटील , पो ना किशोर राठोड , रणजित जाधव , श्रीकृष्ण देशमुख , ईश्वर पाटील , अभिलाषा मनोरे , पो कॉ योगिता पाचपांडे , स फौ रमेश जाधव , हे कॉ भारत पाटील , रावेरचे हे कॉ विष्णू जावरे , पो ना सुरेश मेढे , पो कॉ प्रमोद पाटील व सचिन घुगे हे या कारवाईत सहभागी झाले होते .
गुप्त माहितीतील वर्णनाप्रमाणे एक महिला आल्यावर तिच्या चौकशीत तिने तिचे नाव अख्तरीबानो पिता अब्दुल रऊफ ( वय ४५ , रा – मोमीनपुरा , वडा कमेलापास , ता , जि – बऱ्हाणपूर ) असल्याचे सांगितले . या महिलेच्या झडतीतून तिच्या ताब्यातून १ कोटी ८ हजार रुपये किमतीची अंदाजे ५०० . ४ ग्राम वजनाची हेरॉईनची दोन पाकिटे जप्त करण्यात आली. या महिलेला अटक केल्यावर तिने आपल्याला ही हेरॉईन सलीम खान शेर बहादूर खान ( रा किटी पानी कॉलनी , मंदसौर , मध्य प्रदेश ) यांच्याकडून मिळाल्याची माहिती दिली . या महिलेच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास रावेरचे पो नि कैलास नागरे व स पो नि शीतलकुमार नाईक करीत आहेत .