जळगाव ( प्रतिनिधी ) – फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने ६ व्यापाऱ्यांकडून २९ लाख रुपये उकळणाऱ्या २ भावांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे .
साईराम बालाजी पाटील व परमेश बालाजी पाटील ( रा – हैदराबाद ) अशी या आरोपी भावांची नावे आहेत . या दोन भावांच्या विरोधात पारोळा येतील व्यापारी संजय शर्मा यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात २२ ऑक्टोबर २०२१ रोजी फिर्याद दाखल केली होती . या आरोपींनी शर्मा यांना जुलै २०२० ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत डेनिम हब लाईफस्टाईल प्रा लि या कंपनीची फ्रँचायझी मिळवून देतो , दुकानाचे भाडे दर महिन्याला कंपनीकडून दिले जाईल असे सांगत पाच लाखांची मागणी केली होती . त्यानुसार फिर्यादीने त्यांना मागणीनुसार वेळोवेळी पैसे देत ही रक्कम दिली होती मात्र आरोपींनी ठरल्यानुसार काहीच न केल्याने त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती .
पोलीस तपासात या आरोपींनी फैजपुर येथील मयुर मंडवाले यांचे रुपये चार लाख, धुळे येथील नारायण शिंपी यांचे रुपये सात लाख, चाळीसगांव येथील योगेश महाले यांचे रुपये सात लाख तर पालघर येथील ओमप्रकाश व्यास यांचे रुपये सहा लाख अशी सर्वांची मिळुन एकूण एकोणतीस लाखांची फसवणूक केलेली असल्याचे निष्पन्न झाले होते
आरोपींना फौजदारी प्रकिया संहितेचे कलम ४१(अ) नुसार त्यांच्यासमोर हजर राहण्याबाबत नोटीस दिली. परंतू, आरोपींना अटकेची भिती असल्यामुळे या गुन्ह्याच्याकामी अटकेपासुन संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी जळगांव जिल्हा व सत्र न्या एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात फौजदारी जामिन अर्ज क. १०४०/२०२१ अटक पुर्व जामिन मिळण्यासाठी दाखल केलेला होता. सायबर पोलीस स्टेशनचे पो नि लिलाधर कानडे यांनी लेखी खुलासा व तपासाचे कागदपत्र जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्याकडे दिले.
जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी युक्तिवाद करुन तपासाची कागदपत्रे न्यायालयाला सादर केली . न्यायालयाने आज दोन्ही आरोपींची तपासा दरम्यान आवश्यकता असल्याच्या कारणाने तसेच मोठी आर्थिक फसवणूक असल्याने त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर फिर्यादी संजय शर्मा यांच्यातर्फे अँड. अकिल ईस्माईल यांनी काम पाहिले.