नवी दिल्ली (वृत्तासनसंस्था ) – देशात कोरोनाच्या संकटादरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताना त्या म्हणाल्या की, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कमजोर आणि अस्पष्ट खरेदी धोरणांमुळे पुरवठा साखळीतील अडचणींमुळे शेतकरी त्रस्त आहेत. त्यांच्या समस्या वेगाने सोडवल्या पाहिजेत. पुढच्या टप्प्यात खरीप पिकासाठीही शेतकऱ्यांना सुविधा मिळायला हवेत असेही त्यांनी म्हटले. सोनिया गांधी यांनी शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांचा मुद्दा उपस्थित केला आणि केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला ७५०० रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी सदोष पीपीई कीट बाबत चिंता व्यक्त केली आणि देशात अजूनही कोरोना चाचण्या कमी प्रमाणात होत असल्याची खंत व्यक्त केली. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी लोकांना आपला रोजगार गमवावा लागला. बेरोजगारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे कारण आर्थिक उलाढाली ठप्प झाल्या आहेत. या संकटाशी निपटण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला किमान ७५०० रुपये द्यायला हवेत, असे सोनिया गांधी यांनी म्हटले.
तीन आठवड्यापूर्वी झालेल्या आपल्या बैठकीनंतर कोरोना विषाणू वेगाने पसरला आहे. मजूर अजूनही फसलेले आहेत. ते सध्या बेरोजगार आहेत आणि घरी परतण्यासाठी उत्सुक आहेत. ते सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. संकटाच्या या काळी त्यांना खाद्य सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा उपलब्ध करुन दिली पाहिजे.