उपमुख्यमंत्री अजित पवारांना अपेक्षा चौफेर प्रगतीची
जळगाव ( प्रतिनिधी ) – मला जळगाव जिल्हा दूध संघाच्या सगळ्या नियोजित विस्तारात यश अपेक्षित आहे स्पर्धा सर्वच व्यवसायात आहे म्हणून आता दररोज ५ लाख लिटर्स दूध संकलनाचे लक्ष्य निर्धारित करा असा सल्ला आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा दूध संघाच्या संचालकांना दिला .
जळगाव जिल्हा दूध संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आधिनिक प्रक्रिया यंत्रणा , पॅकिंग व दुग्ध जाण्या पदार्थ निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले . या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे , पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर , आमदार चिमणराव पाटील , आमदार अनिल भाईदास पाटील , माजी खासदार मोरे काका , माजी खासदार ईश्वरलाल जैन , माजी मंत्री सतीश पाटील , आमदार किशोर पाटील , विधानसभा माजी अध्यक्ष अरुण गुजराथी , महापौर जयश्री महाजन , खासदार रक्षा खडसे , आमदार शिरीष चौधरी , जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील , माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अँड रवींद्रभैय्या पाटील , जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे , जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर , माजी आमदार अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .
चाळीसगावात प्रस्तावित असलेले नवे अद्ययावत दूध संकलन केंद्र असो की पशुखाद्य कारखाना उभारणी असो ; दुग्ध विकास खात्याकडे जळगाव जिल्ह्याचे कोणतेच काम अडून राहू देणार नाही , या जिल्ह्याला जे पाहिजे ते देऊ अशी ग्वाहीही आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली . ते पुढे म्हणाले की , माझ्या भागातही दूध व्यवसाय चांगला आहे . स्व मधुकरराव चौधरी , स्व के एम बापू पाटील , स्व जि . तु . महाजन यांनी या दूध संघाची स्थापना १९७१ साली केली . आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक चढ – उतार आले . शेवटी संचालक संस्था कशी चालवतात यावर त्या भागाची आर्थिक सुबत्ता अवलंबून असते . येथे कधी काळी दुधाचे पैसे , पगाराचे पैसे थकले . आता हा दूध संघ मजबूत होऊ पाहतो आहे . या दूध संघाची सव्वाशे एकर जागा आज कोट्यवधी रुपये किमतीची आहे यावरून संस्थापकांचे दूरदृष्टी लक्षात येते . शेती आणि शेतीपूरक व्यवसायही नैसर्गिक संकटात सापडल्यास डबघाईला येतात . पण मार्ग काढावे लागतात . माझी हात जोडून विनंती आहे की आता या जिल्हा दूध संघाला दुष्ट लागू देऊ नका . तुमच्या मागण्यांबद्दल आता ४ दिवसात पालकमंत्र्यांना बोलावून घेऊन मी सुनील केदार यांना मंजुरीबद्दल सांगतो.