जळगाव ( प्रतिनिधी ) – पगारवाढ आणि वेळेत पगाराची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे . विलीनीकरणाचा निर्णय एकटे राज्य सरकार घेऊ शकणार नाही हाय कोर्टाच्या भूमिकेतून नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यावर तो निर्णय होऊ शकेल मात्र आता सहनशीलतेचा अंत पाहू नका असे आवाहन आज जळगावात एस टी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले .
जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रपरिषदेत बोलत होते . ते पुढे म्हणाले की , आजूबाजूच्या राज्यांमधील परिवहन कर्मचाऱ्यांच्या पगाराचा अभ्यास करून आता आपल्या राज्यातही एस टी कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू केलेली आहे . अन्य राज्यांमधील परिवहन कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आपल्या राज्यातही वेतन आता मिळते आहे . असे असतानाही सामान्यांना आणि विद्यार्थ्यांना खात्रीची वाटणारी ही वाहतूक व्यवस्था बंद आहे . कर्मचारी आपलेच आहेत , प्रवासीही आपलेच आहेत , ते हट्टाला पेटले आहेत हे योग्य नाही . समजूतदारपणाची भूमिका घेतली गेली पाहिजे . आम्ही समन्वय , तडजोडीने सातत्याने चर्चा करीत आहोत ते काहीच पाऊल मागे घ्यायला तयार नाहीत आता मात्र सहनशीलता संपायची वेळ आली आहे त्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये शेवटी हे जनतेचेच नुकसान आहे . उद्या मेससारखा किंवा काही टोकाचा निर्णय घेतला गेला तर काय ? यापूर्वीच्या तुटेपर्यंत ताणल्या गेलेल्या संपांमध्ये काय परिस्थिती झाली ? असा सगळा विचार एस टी कर्मचाऱ्यांनी करावा असेही ते म्हणाले.