अमळनेर ( प्रतिनिधी ) – हिंगोणे परिसरातून अवैध वाळू तस्करीत सहभागी असणार्या चौघांविरूध्द पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला .
पो नि जयपाल हिरे यांनी बोरी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रणाचे सहकार्यांना निर्देश दिले आहेत. काल पहाटे हे कॉ अरुण बागुल, समाधान पाटील, सागर साळुंखे, रोहिदास आगोने, फारुख शेख यांच्या पथकाने हिंगोणे शिवारात छापा टाकला.
या वेळी पोलिसांना गजानन ठाकूर, राज ठाकूर हे दोघे भ्रमणध्वनीवरून काही लोकांना माहिती देत असल्याचे दिसून आले. त्यांची चौकशी करताच त्यांनी ट्रॅक्टर मालक व चालकांना माहिती पुरवत असल्याचे सांगितले. ते खबरी असल्याचे दिसून आले. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी नदी पात्रात जाऊन तपासणी केली. चालक किसन भील वाळूने भरलेले ट्रॅक्टर रिकामे करून पळून जाताना आढळला. त्याने मालकाचे नाव प्रमोद महाजन असल्याचे सांगितले. पोलिसांनी चौघांना ट्रॅक्टरसह ताब्यात घेऊन समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर चोरी व संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.