पाचोरा ( प्रतिनिधी) – कोरोनामुळे अनाथ झालेल्या चार मुलींची जबाबदारी घेणारा ‘ धर्माचा ‘ बापही कोरोनानेच हिरावून घेतला … आपल्याला तळहातावरच्या फोडासारखे जपलेल्या बापाच्या या स्मृती अंतःकरणात साठवलेल्या या चौघींपैकी तिसरी काल नवरी बनून बोहल्यावर चढली खरी .. पण हयात होता तोपर्यंत जणू पृथ्वीवरचा परमेश्वर ठरलेला अन आत्मानुरागी भिनलेला हा बाप या मंगलसमयी जवळ नसणे खटकत होते . नियतीने आपल्याला हताश ठरवले ही सल बोचत होती . या शोकविव्हळतेवर मार्ग काढताना नवरीने बापाची भाबडी माया माझ्या लग्नात साक्षीला असावी म्हणून बापाचा पुतळा तयार करून घेतला आणि लग्नात उभारलेल्या ‘ धर्माच्या ‘ बापाच्या पुतळ्याचे आशीर्वाद घेत भावविभोर आदरांजली वाहिली !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होत्याचे नव्हते होऊन अनेक कुटूंबानी घरातला कर्ता पुरुष गमावला . पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावानेही अनेक सहृदयी ग्रामस्थ गमावले . नांद्रा येथील अशा चार अनाथ मुलींचे एकटे खंबीर आधारस्तंभ बनलेले सदाचारी व हसतमुख व्यक्तिमत्त्व माजी सैनिक भागवत पाटील यांचे अनपेक्षितपणे कोरोनामुळे निधन झाले . त्यांच्या या चार मुलींपैकी दोनच मुलींचे लग्न झालेले होते . कुटूंबावर हा मोठा आघात होता . या परिस्थितीत त्यांच्या पत्नी धीराने मुलींना उमेद देत होत्या त्यांना त्यांचे अभियंता आणि लष्करात असलेल्या दोन्ही जावयांनीही सावरले .
कै.भागवतफौजी यांना तिसऱ्या मुलीचे लग्न थाटात करायचे होते पण ते स्वप्न उराशीच घेऊन ते अचानक कुटूंबातून निघून गेल्याने त्यांची स्मृती कायम मुलींना आपल्या घरात असावी व पप्पा आपल्यातच असल्याची जाणिव सदैव राहावी असे वाटायचे . या मनस्थितीतून जावयांना आणि मुलींनी त्यांचा सिल्व्हर चेअरवरचा सुमारे दोन लाख किंमतीचा पुतळा बनवून घेतला लग्नात या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेतला याप्रसंगी आलेले सर्व नातेवाईक , वर्हाडी यांचे डोळेही पाणावले होते . मुलींचे पप्पावरचे हे प्रेम पाहून सर्वांना गहिवरुन आले होते.







