जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मंगलपुरी , मेहरूण भागात २०११ सालात घडलेल्या आसाराम पवार हत्याकांडातील एका दोषीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे . या खटल्यातील दुसऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे .

मेहरूण भागात ६ फेब्रुवारी २०११ रोजी हि घटना घडली होती . सुरेश बंजारा याचे काही लोकांशी भांडण सुरु होते . हे भांडण सोडवण्यासाठी मयत आसाराम पवार हा मध्यस्थी करीत होता . या झटापटीत दोषी व सुरेश बंजारा याचा जावई कल्लुसिंग राजपूत याने आसाराम पवारच्या छातीवर डाव्या बाजूला चाकूने वार केले होते . गंभीर जखमी झालेल्या आसाराम पवार याचे उपचार सुरु असताना शासकीय रुग्णालयात निधन झाल्यांनतर पोलिसांनी या गुन्ह्यात ३०२ या कलमाची वाढ केली होती . आसाराम पवार यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात आरोपी कल्लुसिंग राजपूत व जितेंद्र शंकरसिंग राजपूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केल्यावर या खटल्यात १ जुलै २०२१ रोजी आरोप निश्चिती करण्यात आली होती . तत्कालीन पो उ नि बी ए कदम यांनी हे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते . या खटल्यात न्यायालयासमोर ५२ कागदपत्रे ठेवून ६ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या होत्या . सुनावणी पूर्ण झाल्यांनतर आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगमलानी यांनी दोषी कल्लुसिंग राजपूत याला जन्मठेपेसह ५ हजार रुपये दंडाची आणि दण्ड न भरल्यास ३ महिने सध्या कारावासाची शिक्षा सुनावली . दुसरा आरोपी जितेंद्र राजपूत याची निर्दोष मुक्तता केलीय . या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अँड प्रदीप महाजन यांनी युक्तिवाद केला . त्यांना पेरावी अधिकारी राजेंद्र सैंदाणे यांनी सहकार्य केले.







