मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – कुर्हा गावातील जळगाव ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापार्यांमध्ये भीती पसरली आहे. चोरट्यांनी दुकानाची कडी तोडली मात्र दुसरे लॉक न तुटल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याने अप्रिय घटना टळली.
बुधवारी बालाजी कॉम्प्लेक्समधील दीपक सोनी आपले जळगाव ज्वेलर्स दुकान उघडण्यासाठी आले असता एक बाजूचा कडी-कोयंडा तुटलेला व मध्यभागी असलेला लॉक तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजताच दीपक सोनी यांनी दीपक कुमट, माजी सरपंच प्रकाश चौधरी, नितीन कासार यांना माहिती कळवली. पोलिसांना माहिती कळताच स.फौ माणिक निकम, गोपीचंद सोनवणे, संजय लाटे, पो कॉ सागर साबे यांनी धाव घेतली. पोलिसांसमक्ष दुकान उघडल्यानंतर माल सुरक्षित असल्याचे दिसून आले.
दुकानातील व बालाजी कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर स्कॉर्पिओ वाहनातून तीन चोर उतरल्यानंतर त्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी वाहनाच्या क्रमांकासह चोरट्यांच्या छबीवरून शोध सुरू केला आहे. परीसरात एकाच महिन्यात तिसर्यांदा चोरीचा प्रकार घडल्याने व्यापारी धास्तावले आहेत. यापूर्वी दिनेश जैस्वाल यांच्या अंबिका ट्रेडिंग या धान्य दुकानातून 43 हजार तर सुमित चौधरी यांच्या कपाशीच्या दुकानातून एक लाख 55 हजारांची रोकड लांबवण्यात आली होती. महिना उलटूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही त्यामुळे व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.