जळगाव ( प्रतिनिधी ) – शहराचे भूषण असलेल्या बालगंधर्व खुले नाट्यगृहाचे लाकडी स्टेज उखडून तेथे पक्के सिमेंटचे काम महापालिकेने सुरु केले होते . खरे तर नाट्यगृहात लाकडी स्टेज ही तांत्रिक , शारीरिक आणि शास्त्रीयदृष्टया मूलभूत गरज असते . या कोणत्याच बाबीचा काहीच विचार न करता सिमेंटचे पक्के फरशांचे बांधकाम म्हणजे नुसता बिनडोकपणा आहे , असा संताप जिल्ह्यातील रंगकर्मींनी व्यक्त केला आणि हे काम बंद पाडले आहे . यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनाही बोलावून घेण्यात आले होते .


शहर किंवा जिल्ह्यातील कोणत्याच नाट्यकर्मींना विश्वासात न घेता हे ‘ आगाऊ नाटक ‘ महापालिकेने सुरु केले होते . या नाट्यगृहात स्टेजची नासधूस सुरु असल्याचे समजल्यावर सगळे नाट्यकर्मी जमले आणि त्यांनी हे काम आधी बंद पाडत आमदार राजूमामा भोळे यांना बोलावून घेतले . त्यांना आपले म्हणणे समजावून सांगितले . त्यानंतर ही बाब आमदार राजूमामा भोळे यांनी संबंधित अभियंता आणि आयुक्तांच्या कानावर टाकली . नाट्यगृहाच्या स्टेजवर सादरीकरण करताना कलाकाराचे शारीरिक संतुलन अबाधित राहावे म्हणून त्याला लाकडी स्टेजच आवश्यक असते अन्यथा त्याच्या सादरीकरणात सुलभता राहत नाही , नैसर्गिक अविष्कारासाठी कलाकारांना जो संतुलनाचा आधार पाहिजे असतो तो पक्के बांधकाम केलेल्या स्टेजवर मिळत नाही , असे या कलाकारांनी महापालिकेच्या फरशांचे काम करणाऱ्या ‘ तज्ज्ञ अभियंत्यालाही ‘ समजावून सांगितले !

महापालिकेचे संबंधित अधिकारी बैठक घेऊन हा ‘ फरशांच्या नाटकाचा ‘ ‘ प्रयोग ‘ सुरु केला असल्याचे सांगत असले तरी ही निव्वळ मनमानी आहे , असे या रंगकर्मींचे म्हणणे होते . अरुण सानप यांनी सांगितले की गेल्या ४० वर्षांपासून आम्ही या बाल गंधर्व खुल्या नाट्यगृहाशी जुळलेलो आहोत . आताच असे काम करण्याची ‘ आयडियाची कल्पना ‘ महापालिकेच्या डोक्यात कशी आली ? , हा प्रश्नच आहे . येथे स्वतः बाल गंधर्व , पंडित भीमसेन जोशी आदींसारख्या ख्यातकीर्त कलावंतांनी सादरीकरण केले आहे . अशी उज्ज्वल परंपरा असलेल्या नाट्यगृहाचा असा खेळखंडोबा सहन होणारा नाही .

आम्ही नाट्यकर्मींच्या भावनांशी सहमत आहोत . महापालिकेने आता नाट्यकर्मींना पाहिजे तसे हे काम पुन्हा करून द्यावे म्हणून मी पाठपुरावा करीन , त्यासाठी सर्व नाट्यकर्मींच्या सोबत महापालिकेच्या आयुक्तांची बैठक आयोजित करीन . गरज पडल्यास माझ्या स्थानिक विकास निधीतून या खर्चासाठी तरतूद करायला लावीन , असे यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले.

यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह अँड. कुणाल पवार , अरुण सानप , विलास भोळे , दीपक राजपूत , गौरव लवंगाले , अरुण नेवे आदी उपस्थित होते.









