मुंबई ( प्रतिनिधी ) – विधिमंडळाच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किती हे मात्र अजूनही ठरलं नाही. 24 डिसेंबरला अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात येईल यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात नव्हे तर मुंबईत होईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली
22, 23, 24 असा कार्यक्रम नक्की झाला आहे, दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर असा कार्यक्रम ठरला आहे, अशी माहिती विधिमंडळ कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिलीय. यंदाचं हिवाळी अधिवेशन किती दिवसांचं असेल हे मात्र अस्पष्ट आहे. या अधिवेशनात 11 विधेयके मांडली जातील.अधिवेशनात प्रश्नोत्तरे देखील घेतली जातील, अशी माहिती परबांनी दिली. अधिवेशन वाढवण्याचा निर्णय 24 डिसेंबरला होईल.
दरवेळी हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतलं जातं, मात्र मुख्यमंत्री स्वतः अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याने मुंबईत अधिवेशन घेतले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रियेनंतर हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशन नागपुरला व्हावे अशी विरोधकांची मागणी होती, उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली ,मात्र मुख्यमंत्र्यांची तब्येत बघता हे अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
नव्या कोरोना व्हेरिएंटवर आजच्या बैठकीत चर्चा झाली ज्यांचे दोन डोस झाले असतील, त्यांनाच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे अधिवेशनात किती सदस्य उपस्थित असतील हेही सांगता येत नाही. अधिवेशनात हजेरी लावण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टदेखील बंधनकारक असणार असल्याचं परबांनी सांगितलंय.
एसटीच्या संपावर बोलताना अनिल परब म्हणाले, जो कुणी नेता एसटी सपाची जबाबदारी घेतो, त्याने कामगारांच्या नुकसानाची देखील जबाबदारी घ्यायला हवी. विलीनीकरनावर समिती व्यतिरिक्त कुणीही निर्णय घेऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. समितिला 12 आठवड्याची मुदत दिली आहे, तोपर्यंत संप मागे घ्यावा. कोणी भावना भडकवत असेल तर तुमचे नुकसान होत आहे, असं आवाहनही त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांंना केलंय. लोकांना एसटीची गरज आहे. शाळा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे शाळकरी विध्यार्थ्यांना एसटीची गरज आहे. 18 हजार कर्मचारी सेवेत आलेले आहेत. 1 हजार 25 बसेस बाहेर आहेत, अशी माहितीही परबांनी दिली.