जळगाव ( प्रतिनिधी ) – आज अचानक सकाळीच महापौर जयश्री महाजन यांनी गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर कार्यालये असलेल्या लोकांना आश्चर्याचा धक्का दिला . त्या थेट सफाई कामगारांचा ताफा सोबत घेऊनच चौथ्या मजल्यावर आल्या आणि पूर्ण चौथा मजला आधी स्वच्छ करून घेतला . या संपूर्ण मार्केटच्याच नियमित सफाईचा कामात कामचुकारपण सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महापौर जयश्री महाजन यांनी जातीने या चौथ्या मजल्याच्या प्रत्येक कानाकोपरा धुंडाळून काढला आणि या कामगारांना कामाला लावले . जवळपास चार वर्षांपासून या मजल्यावर सफाईची वरवरची कामे केली जात होती .काही लोकांनी कार्यालयांच्या नूतनीकरणाच्या कामांच्या वेळी निघणारा मलबा आणि निरुपयोगी वस्तू काही कोपऱ्यांमध्ये आणून टाकलेल्या होत्या . त्यामुळे दिवसेंदिवस कचरा वाढतच होता अशा निरुपयोगी वस्तूंचे ढीग साचत जाऊन वाढत असल्याने नियमित सफाई करणाऱ्या कामगारांनाही त्रास होत होता .
गोलाणी मार्केटमध्ये दुकाने आणि कार्यालये असलेल्या दुकानदारांनी आणि कार्यालय प्रमुखांनी डस्टबिन मध्येच नियमित कचरा टाकण्याची शिस्त पाळावी , अस्वच्छता वाढून सफाई कामगारांना त्यांचे नियमित काम त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घेऊन महापालिकेला सहकार्य करावे , ओला आणि सुका कचरा वेगळा करून सफाई कामगारांचे काम सोपे करावे , सफाई कामगारांना त्यांचे काम करताना करावी लागणारी थकवणारा पायऱ्या चढण्याचा आणि उतरण्याचा त्रास वाढणार नाही याची काळजी घेण्याचे सौजन्य दाखवणे अपेक्षित आहे , असे महापौर जयश्री महाजन यांनी केसरीराज साप्ताहिक आणि न्यूज पोर्टलच्या कार्यालयातील झालेल्या चर्चेत सांगितले . यावेळी संपादक भगवान सोनार , मुख्य स्वच्छता निरीक्षक संजय अत्तरदे , आरोग्य निरीक्षक एन एम साळुंके , आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे , मुकादम रवी सनकत , इम्रान भिस्ती , अर्जुन पवार आदी उपस्थित होते .