मुंबई ( प्रतिनिधी ) – शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचा अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल युनिटने सोमवारी राजस्थानमधील २८ वर्षीय तरुणाला अटक केली.
राजस्थानमधील सिकारी जिल्ह्यातील मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. २० ऑक्टोबररोजी मेवने महिला असल्याचे भासवून शिवसेना आमदाराकडे मदत मागितली आणि मेसेज करुन संपर्क साधला होता अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
कुडाळकर यांनी मदत करण्यास सहमती दर्शवली. महिला असल्याचे भासवत मेवने कुडाळकर यांना व्हिडिओ कॉल केला जो काही सेकंद चालला. त्यानंतर मेवने आमदार मंगेश कुडाळकर यांचा एक अश्लील व्हिडिओ बनवला आणि व्हॉट्सअॅपवर पाठवला. त्यांनतरे मेव कुडाळकर यांच्याकडे पैशांची मागणी करू लागला.
कुडाळकर यांनी सुरुवातीला काही रक्कम दिली, पण नंतर, जेव्हा मेवने अधिक पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी भरतपूरला पोहचत स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले . कुडाळकर यांनी कुर्ला पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई सायबर क्राईम पोलिसांनी आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. त्यानंतर राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील आय लोकेशनवरून मुंबई पोलिसांचे पथक भरतपूर येथे पोहोचले. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. यावर सिक्रीचे एसएचओ पुरणचंद आणि मुंबई पोलिसांच्या पथकाचे पोलीस निरीक्षक खेत्रे यांनी व्यूहरचना आखली आणि त्याच्या गावात छापा टाकून या आरोपीला पकडले.