मुंबई ( प्रतिनिधी ) – सध्याच्या प्रश्नातून मार्ग काढून एस टी कामगार आणि जनतेचं समाधान कसं करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली, असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले
एसटीच्या संपामुळं ग्रामीण भागातील लोकांचं आणि शाळेत जाणाऱ्या लोकांचे हाल होतं आहेत. शरद पवार यांनी अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली. एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करणं, एसटी भविष्यात कशी रुळावर येईल आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आताच्या मागण्या यासंदर्भात चर्चा केली.
विलीनीकरणासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशानं नेमलेल्या समितीकडून अहवाल येईल. त्या समितीपुढं कोणती बाजू मांडायची यासंदर्भात चर्चा झाली. विलीनीकरणासंदर्भात हायकोर्टानं नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकारला जाईल. एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि इतर राज्यांमधील कर्मचाऱ्यांचं वेतन यासंदर्भात चर्चा झाली. वेतनवाढ कशी देता येईल यासंदर्भात चर्चा झाली, असं अनिल परब यांनी सांगितलं.
हायकोर्टाच्या समितीचा अहवाल यायला वेळ लागणार आहे. त्यामुळं कोणीही ठाम भूमिका घेऊन चालणार नाही. एसटी कर्मचारी आणि जनतेच्या हिताचा मध्यममार्ग काढण्याचा निर्णय घेतला जाईल. वेगवेगळे मार्ग आहेत. जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत अधिक माहिती सांगता येणार नाही. एसटीच्या प्रश्नी कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा होईल, असंही अनिल परब म्हणाले.