पुणे ( प्रतिनिधी ) – तीनपत्ती खेळताना झालेल्या वादातून चाकूने भोकसून तरुणाचा खून झाल्याची घटना मावळ तालुक्यातील इंदोरी येथे शनिवारी रात्री घडली. शाबुद्दीन अन्सारी (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रियाज निसार अन्सारी (वय २३, रा. इंदोरी, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जलाल शेख, मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्राईल अन्सारी (तिघेही रा. इंदोरी, ता. मावळ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
फिर्यादी रियाज, मयत शाबुद्दीन, अब्दुल हनान अन्सारी आणि आरोपी जलाल हे चौघे इंदोरी येथे भाड्याने खोलीत राहतात. शनिवारी रात्री ते तीनपानी पत्ते खेळत होते. या खेळाच्या नियमावरून शाबुद्दीन आणि जलाल शेख यांच्यात वाद झाला. त्यानंतर जलाल शेख त्याच्या घरी गेला. तो त्याच्या दोन मेहुण्यांसोबत चाकू घेऊन परत फिर्यादी यांच्या खोलीत आला. तिघांनी शाबुद्दीनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्राईल अन्सारी यांनी शाबुद्दीनला पाठीमागून घट्ट पकडले. जलाल याने शाबुद्दीनच्या छातीवर, पोटावर, डोळ्याजवळ चाकूने भोकसले. यात शाबुद्दीनचा मृत्यू झाला.