मुंबई (वृत्तसंस्था) – निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे.
विधानपरिषदेच्या 5 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य रामदास कदम (मुंबई ), भाई जगताप (मुंबई), सतेज पाटील (कोल्हापूर), अमरीशभाई पटेल (धुळे नंदूरबार), गोपीकिसन बाजोरिया (अकोला बुलढाणा वाशिम) आणि गिरीश व्यास (नागपूर ) यांची 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे.
या निवडणुकीत नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर आहे .छाननी – 24 नोव्हेंबररोजी झाल्यावर २६ नोव्हेम्बरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत मतदान 10 डिसेंबरला व मतमोजणी 14 डिसेंबरला होणार आहे .
निवडणूक आयोगाने मुख्य सचिव यांना निवडणुकीसाठी कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने निवडणुकीचे संचलन तसेच आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे निर्देश दिलेले आहेत, असे उप सचिव अ.ना.वळवी यांनी कळविले आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानं देगलूर बिलोली निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.