चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – औरंगाबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या रूग्णवाहिकेने धडक दिल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली . पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या सफेद निळ्या रंगाच्या रूग्णवाहिकेने धडक दिल्याने दिपराज मोतीराम चव्हाण (वय-१० , रा. मिटमिटा ता.जि. औरंगाबाद ) या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव ते कन्नड मार्गावर २ नोव्हेंबररोजी दुपारी बोढरे शिवारातील पैलवान ढाब्याजवळ घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली घटना घडताच रूग्णवाहिका कन्नड घाटाकडे पसार झाली. गणेश भावराव खरात ( ह.मु. बोढरे शिवार) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम-३०४ (अ), २७९ व मोटार वाहन अधिनियम कलम १८४ व १३४ ( ब) प्रमाणे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो नि संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास नितीन सोनवणे हे करीत आहेत.







