जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘ जाको राखे साईया , मार साके न कोई ‘ हा श्रद्धाभाव जळगावात प्रत्यक्ष प्रचितीला आलेल्या आणि अमळनेरच्या एका दीड दिवसाच्या बेवारस बाळासाठी ‘ यशोदा ‘ अन ‘ वासुदेव ‘ बनलेल्या पोलीस , डॉक्टरांचा नियतीशी संघर्ष आज अपयशी ठरला … ‘ त्या ‘ बाळाची मृत्यूशी झुंज संपली !! डुकरांनी या तान्हुल्याच्या डोक्याचे व शरीरावर अन्यत्र अक्षरशः लचके तोडले होते . निर्दयी मातेने त्याला दिलेल्या मरणयातना जणू त्याने नियतीशी मांडलेल्या उभ्या दाव्यावर भारी पडल्या अन सगळंच संपलं …..
चा बाळाला वाचवण्यासाठी ‘ यशोदा ‘ बनलेल्या अमळनेरच्या महिला पोलीस कर्मचारी व जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील महिला डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्यासह ‘ वासुदेवाची ‘ जबाबदारी प्रमाण मानणारे पुरुष पोलीस कर्मचारी आणि डॉक्टर्स त्याचा जीव वाचवण्याची धडपड करीत होते !
स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला ( दीड दिवसाच्या मुलीला) अमळनेर बसस्थानकातील शौचालयाजवळ निर्दयीपणे कचऱ्यात फेकून दिल्याची घटना ३१ ऑक्टोबररोजी घडली होती. आधी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने या नवजात अर्भकाला अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ जी . एम . पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचार करून त्याला जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला . नतर अमळनेरच्या पोलीस कर्मचारी सारिका जरे व सुनीता पाटील यांनी त्या बाळाला घेऊन जळगावचे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय गाठले . जळगावात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात या नवजात अर्भकाला १० २ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून चालक मनोहर पाटील यांना सोबत घेऊन या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखल केल्यावर सीएमओ डॉ . स्वप्नील कळसकर , बालरोगतज्ज्ञ् डॉ हितेंद्र भोळे , नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ शैलजा चव्हाण यांनी शक्य तेवढ्या उपचारांची व्यवस्था केली . या अवघ्या दीड दिवसाच्या या बाळाचे डुकरासारख्या प्राण्यांनी बाळाचे लचके तोडल्याने त्याला जांघेत , डोक्याच्या मागच्या भागात गंभीर जखमा झाल्या होत्या . शरीरावर अन्यत्रही मोठ्या जखमा झाल्या होत्या .
या बाळाच्या उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बालकांवर गंभीर अवस्थेत उपचारांची आवश्यक सुविधा नसल्याने त्याला गोदावरी महाविद्यालय रुग्णालयात दाखल केलेलं होतं .गोदावरी महाविद्यालय रुग्णालयात तेथील व्यवस्थापनाने काहीही आडकाठी न आणता जिल्हा रुग्णालय महाविद्यालयाच्या विनंतीवरून अगदी मोफत उपचार सुरु केले होते !
अगदी दीड ते दोन दिवस वय असले तरी ३ किलो वजनाचे हे तंदुरुस्त बाळ ( स्त्री जातीचे अर्भक ) पोलिसांसह डॉक्टरांच्याही प्रेमाला पात्र ठरले होते ! एकीकडे नियतीने नाकारले तरी माणसांच्या या प्रेमाचा जोरावरच त्याचा हा नियतीशी उभा दावा जणू त्याने मांडला होता ! मात्र आज त्याचा आठवडाभराचा मृत्यूशी संघर्ष आणि डॉक्टर व पोलिसांचे प्रयत्न हे सगळे निरर्थक ठरले !
हे बाळ गंभीर जखमी अवस्थेत सापडल्यानंतर सहा तासातच अमळनेरच्या पो नि जयपाल हिरे, एपीआय मच्छीन्द्र दिवे यांच्या पथकाने गर्भवती महिला कोणकोणत्या दवाखाण्यात तपासायला आल्या होत्या याची चौकशी केली व यातून संशयित महिलेचा छडा लावला होता . अमळनेर ग्रामीण रुग्णालयात चांदणी कुऱ्हे येथील विद्याबाई महेंद्रसिंग पाटील ही महिला नातेवाईकांसोबत पोट दुखते म्हणून तपासणीसाठी आली होती. ती गरोदर असल्याने व आधीही तिचे सिझर झाले असल्याने जोखीम नको म्हणून तिला धुळे जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार धुळ्याला तिचे सीझर करून प्रसूती करण्यात आली.
धुळ्यात या महिलेला मुलगी झाली. त्यानंतर तिने व तिच्या वडिलांनी धुळे जिल्हा रुग्णालयात डिस्चार्जसाठी गोंधळ घातला होता. काही वेळाने त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळ काढला व अमळनेर बसस्थानकावर आल्यावर मुलीला निर्दयीपणे शौचालयाजवळ फेकून दिले होते.
अमळनेर पोलीस स्टेशनला जिवंत अर्भक फेकल्याचा गुन्हा दाखल झाला आरोपी महिलेचे वडील दत्तू पाटील हे दारू पित होते. ते अस्वस्थ अवस्थेत पडलेले आढळून आल्याने गावकऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला होता आज हे बाळपण गेले.
आता गोदावरी रुग्णालयाकडून या बाळाचे पार्थिव ताब्यात घेऊन जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन केले जाणार आहे आणिं नंतर ते अमळनेर पोलिसांकडे सुपूर्द केले जाणार आहे.