जळगाव ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील सामरोद येथे योगेश सदाशीव धुंदाळे (वय २५) या तरूण शेतकऱ्याने दिवाळीच्या दिवशीच नापिकी व कर्जाला कंटाळून गळफास घेतला. दुसऱ्या घटनेत खादगाव येथील पूजा निवृत्ती पाटील हीनेही ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
पूजा हिने आत्महत्या का केली याबाबत लगेच काही कळू शकले नाहीय. दरम्यान, ऐन दिवाळी सारख्या प्रकाश पर्वाच्या दिवशी वेगवेगळ्या दोन घटनांनी आशेचे दीप विझल्याने उपजिल्हा रुग्णालय परिसरात जमलेले आप्तेष्ट, नागरिक हळहळ व्यक्त करत होते.
सामराेद येथील योगेश धुंदाळे या तरूण शेतकऱ्याने दिवाळीच्या दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील सदाशिव निना धुंदाळे यांचे वय ६० वर्ष आहे. त्यांच्याकडून शेतीची कामे होत नाहीत. काही वर्षांपासून योगेश स्वत: शेती करून कुटुंबाचा गाडा चालवत होता. यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले लागलेला खर्चही निघणार नाही. पुढील काळात घराचा गाडा कसा चालवावा, या विवंचनेत योगेश धुंदाळे गुरुवारी सकाळी बैलगाडी घेऊन शेतात गेले. तेथेच गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही योगेश जेवणासाठी घरी आले नाही. त्यामुळे योगेशला बोलावण्यासाठी गेले असता त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
पूजा निवृत्ती पाटील या खादगाव येथील २१ वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी तीची आई दुसऱ्या खोलीत घरकाम करत होती. काहीतरी आवाज झाल्याने आई तिच्या खोलीकडे गेली. मुलीने गळफास घेतल्याचे लक्षात येताच आईने टाहो फोडला.