जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राणी चावल्यावर घ्यावयाचे उपचारासाठी दररोज बाधित रुग्ण उपचार करायला येतात. ऑक्टोबर महिन्यात ३९८ जणांनी इंजेक्शन घेऊन उपचार घेतले. प्राण्यांमध्ये माणसांना सर्वाधिक चावे कुत्र्यांनी घेतले आहे.
रुग्णालयात ओपीडी वेळेत कक्ष क्रमांक १०५ मध्ये तर दुपारून आपत्कालीन विभागात हे इंजेक्शन दिले जाते. ऑक्टोबर महिन्यात कुत्र्यांचे चाव्यामुळे ३७६ रुग्णांनी उपचार घेतले. यात २३६ पुरुष, ५१ महिला, ६३ लहान मुले, २६ लहान मुली अशांचा समावेश आहे. याशिवाय उंदीर चावल्यावर ९ पैकी ५ पुरुष, २ महिला, १ मुलगी, १ मुलगा, मांजर चावल्यामुळे ११ पैकी ७ पुरुष, ४ महिला, माकड चावला म्हणून १ महिला व १ लहान मुलाने उपचार घेतले आहे.
दरम्यान, भटक्या व पाळीव प्राण्यांपासून लहान मुलांना शक्यतोवर दूर ठेवा असे आवाहन उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मालकर यांनी केले आहे. कोणताही प्राणी चावला तर उपचार घेण्यासाठी तातडीने रुग्णालयात यावे. कुत्रा चावला तर जखमेवर परस्पर मलमपट्टी करू नये. वाहत्या पाण्याखाली जखम धुवावी. तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे इंजेक्शन घेण्यासाठी यावे. त्यानंतर दिलेल्या पुढील तारखांना इंजेक्शनचे उर्वरित डोस घ्यावेत असेही डॉ. मालकर यांनी कळविले आहे.