नाशिक (वृत्तसंस्था) – नाशिक-पुणे रोडवर आंबेडकर नगर चौकात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने तीन ते चार वाहनांना धडक दिली. या भयावह अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती अशी, आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास आंबेडकर नगर चौकात नेहमीप्रमाणे नागरिक आपल्या दैनंदिन कामात होते.
त्याचक्षणी एक भरधाव ट्रक आला आणि 3 ते 4 वाहनांना जोरात धडक दिली. ट्रकने ज्या वाहनांना धडक दिली त्यात 1 टुव्हीलर, रिक्षाचा समावेश आहे.
हा अपघात इतका भीषण होता की त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.तसेच रिक्षातील 3 ते 4 प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे मोठा गदारोळ माजला होता.
दरम्यान, या घटनेनंतर मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवणा-या चालकाला तेथील स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
आरोपी ट्रकचालक हा दारुच्या नशेत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.