चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – ‘ जिथे कमी तिथे आम्ही ‘ या शब्दांनी जनतेला बळ देणारे आमदार मंगेश चव्हाण सध्या तालुक्याच्या राजकारणात ठळक अधोरेखित होत आहेत . एकीकडे नियतीने संकटे पदरात टाकावी आणि दुसरीकडे धीरोदात्तपणे संकटांचा मुकाबला करताना प्रशासकीय चौकटीचा बागुलबुवाही नाकारणारा आमदार म्हणून ते सर्वमान्य चेहरा आधीच बनले आहेत.


आपल्या कामांच्या जोरावर आता आमदार मंगेश चव्हाण राज्यातही चर्चेत आले आहेत सार्वजनिक जीवनात व्यापक लोकसंग्रहाच्या आधाराने राजकारणाला विधायक वळण देणारा राजकारणी म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांची दखल राज्यातील प्रस्थापित राजकीय नेत्यांनी घेतलेली आहे. आमदार म्हणून जनतेच्या त्रासात आधी माझ्यावर माझ्या तालुक्याची जबाबदारी आहे. हे समजून घेताना त्यांनी सर्वसमावेशकतेच्या धोरणाला प्रमाण मानत पायाभूत विकासाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत म्हणून अभ्यासू नेतृत्वाचा गुण प्रशासनातील वरिष्ठांनाही दाखवून दिला आहे.

कोरोना महामारीत सर्व कुलूप बंद असतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी गरजूंसाठी अन्नसेवेची चूल पेटवली. ही अन्नपूर्णा सलग ६२ दिवस लाखों मुखांपर्यंत पोहचली. ट्रामा केअर सेंटर, असू दे की लोकसहभागातून उभारलेले कोरोना उपचार केंद्र. आमदार मंगेश चव्हाण यांचा दातृत्व कंकण बांधलेला हात सदैव पुढेच राहिला. अत्यवस्थ रुग्णांसाठी त्यांनी याच काळात अद्ययावत मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांचे लढवय्ये मन पेटून उठते. कोरोनातील सार्वजनिक टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यातच कशाचीही तमा न बाळगता त्यांनी कापूस व भरडधान्य खरेदी करण्यासाठी राज्य शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला. कोरोनाकाळात महाराष्ट्राच्या पटलावर झालेले हे पहिलेच आंदोलन ठरले होते.
शेतकरी संघातील भरडधान्य खरेदीतील घोळ उघड करत शेतकी संघावर शासनाकडून कारवाई करण्यास त्यांनी भाग पाडले होते. बोगस ज्वारी – बोगस खते यांचे रॅकेटच्या विरोधात वज्रमुठ आवळली होती.

शेतक-यांच्या वीज तोडणी विरोधातही ते आक्रमक झाले. या आंदोलनात त्यांना १२ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास भोगून आल्यानंतर दुस-याच दिवशी राज्यातील सरकारचे तेरावे घालण्याचे धाडसही त्यांनी दाखवले.
रावळगाव साखर कारखान्याच्या प्रशासनाला वठणीवर आणून शेकडो ऊस उत्पादकांच्या घामाचा पैसा मिळवून दिला. तालुक्यातील शेतकरी आणि ऊसतोडणी मुकादमांचे सुमारे १३ कोटी रुपये या साखर कारखान्याकडे अडकले असल्याचे समजल्यावर त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली. रायगडला जाऊन या शेतकऱ्यांना जयंत पाटलांसमोर उभे करीत त्यांनी आक्रमकपणा दाखवताच काही प्रमाणात शेतकऱ्यांना पैसे मिळाले . अजून हा पाठपुरावा सुरूच आहे. याच प्रश्नावर त्यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदारांसोबत चर्चा केली, त्यावेळी आता आम्ही मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण करू असा इशारा दिलेला आहे.

राज्यात सर्वत्र आंदोलनकर्ते शेतकरीपुत्र आमदार असा त्यांचा दबदबा निर्माण झाला आहे. सत्तेच्या वर्तूळात नसतांनाही लोकसंग्रह आणि कार्यकर्त्यांचे भरीव जाळे त्यांनी निर्माण केले. ‘दिलदार माणूस’ असा वेगळा पैलूही त्यांच्यात आहे. आमदार मंगेश चव्हाण आमदार नव्हते त्यावेळी त्यांनी रणरणत्या उन्हात जनावरांसाठी चारा छावणी उभारली. पशुपालकांनाही दुष्काळात अन्नाचा घास भरविला. नापिकी आणि दुष्काळाच्या शापातून तालुक्याची मुक्तता करण्यासाठी सिंचनाचा आग्रह राज्य सरकारकडे धरला.
जलसाक्षरता संमेलन,ज्येष्ठ नागरिकांना पंढरपुरस्थित विठूरायाचे दर्शन, गरजू महिला, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीच्या मदतनीस आदि भगिनींना दिलेली भाऊबीज भेट, शहिद जवानांचे स्मारक उभारण्यासाठी सुरु असलेली धडपड, कोरोनाने मृत झालेल्या किर्तनकाराच्या कुटूंबाचे पालकत्व. मंगेशदादांच्या शिवनेरी आणि अंत्योदयच्या गाभारी आलेला कुणीही रिकाम्या हातीने कधी परत जात नाही. या सगळ्या व्यापात त्यांना सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांचीही मजबूत साथ असल्याने पक्षाच्या महिला आघाडीला अपेक्षेप्रमाणे ऊर्जास्रोत लाभला आहे जलक्रांती ते पथक्रांती – शिवनेरी फाउंडेशनच्या भूजल अभियानातून चाळीसगाव तालुक्यात नदी – नाले खोलीकरण व शेतरस्ते दुरुस्तीसाठी मोफत पोकलेन, जेसीबी मशीन उपलब्ध करुन दिले.
चाळीसगाव तालुक्यात अभूतपूर्व पूरस्थिती ऑगस्टच्या शेवटच्या व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झाली, ढगफुटीसदृश्य पावसामुळे चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ६९ गावांना महापुराचा फटका बसला. मात्र परिस्थितीला सामोरे जात आमदार मंगेश चव्हाण यांनी महापुराची बातमी तालुक्यात पोहचत नाही, तोपर्यंत प्रशासनाला सोबत घेऊन प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सतत १५ दिवस पायाला भिंगरी लावून नुकसानग्रस्त चाळीसगाव शहर व गावांना भेट देऊन पूरग्रस्तांना दिलासा दिला.
कोकण – पश्चिम महाराष्ट्रच्या धर्तीवर पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी सर्वप्रथम मागणी केली. अनेक कुटुंबांचे घर – संसार वाहून गेल्याने त्यांची अवस्था आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून पाहिली गेली नाही. त्यांनी महापुराच्या दुसऱ्याच दिवशी गरजू ५० बेघर पूरग्रस्तांना ८ दिवसात घर बांधून देण्याचे जाहीर केले व दिलेल्या शब्दाला जागत त्यांना हक्काचे घर देखील ८ दिवसात उभे करून दिले. अनेक गावांचे रस्ते व पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला होता त्या गावांना स्वखर्चाने जेसीबी आदी उपलब्ध करून देत त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडले. जैन उद्योग समूहासह इतर उद्योगांना विनंती करून पूरग्रस्तांना अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले. महापुरात जनतेसाठी २४ तास फिल्डवर राहून त्यांना आधार देणाऱ्या, वेळेची गरज लक्षात घेत स्वखर्चाने हक्काचे छत व मदत उपलब्ध करून देणाऱ्या जनसेवक आमदारांमुळे संकटात असणाऱ्या तालुक्याला उभारी मिळाली.







