जळगाव ( प्रतिनिधी ) – मेहरूण स्मशानभूमी आणि गणेशघाटात नुकतेच स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे महापौर सेवा कक्षाने यासाठी पुढाकार घेतला होता

दरवर्षीप्रमाणे पितृ पंधरवडा यंदा नुकताच संपन्न झाला. या काळात पूर्वजांसह आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे शुभाशीर्वाद अर्थात कृपादृष्टी परिवारावर कायम राहावी, या उद्देशातून प्रत्येकजण आपापल्या घरी पूजा-विधी करून त्यांच्याप्रती अर्पित करण्यात येणारा नैवेद्य स्मशानभूमीतील चौथर्यावर काकस्पर्शासाठी ठेवतो. यामुळे या काळात चौथरा परिसरात काहीशी अस्वच्छता निर्माण होते. तसाच प्रकार मेहरुण स्मशानभूमीतील चौथरा परिसरात झाला होता. 7 ऑक्टोबरोजी ‘महापौर मित्र’कडून व्हॉटस्अॅपद्वारे ‘महापौर सेवा कक्ष’कडे तक्रार (क्र. 2423) नोंदविण्यात आली होती. संबंधित तक्रार निवारणासाठी या कक्षातील प्रतिनिधीने तत्काळ महापालिका अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यावर महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी सतीश करोसिया यांनीही तत्परतेने पाहणी करून सफाई कर्मचार्यांच्या माध्यमातून चौथर्याची स्वच्छता, कचर्याची त्वरेने विल्हेवाट लावत चौथरा परिसर चकाचक केला. मेहरुण तलावाकाठच्या गणेश घाटावरही सर्वपित्री अमावास्येनिमित्ताने पूजा-विधीसह तर्पण अर्पण करून दीपप्रज्वलित केले जातात. त्यामुळे निर्माण झालेली घाणही महापालिका आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचार्यांनी स्वच्छ केली.
शहरातील मंदिरे, धार्मिक स्थळे परिसरात अस्वच्छता असल्यास थेट ‘महापौर सेवा कक्षा’शी संपर्क साधा , असे आवाहन करण्यात आले आहे या कक्षाद्वारे महानगरपालिकेतील स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांमार्फत सफाई कर्मचार्यांकडून परिसर स्वच्छ केला जाऊन मंदिरे, धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले जाण्यास मदत होईल. माहिती देण्यासाठी ‘महापौर सेवा कक्ष’ हेल्पलाईन क्र. 95 90 269 269 यावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 2:30 ते सायं. 5 या वेळेत (शासकीय सुटी वगळता) कॉल करून तक्रार नोंदवावी , असेही सांगण्यात आले.








