चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगावातील शिवाजी चौक ते बडोदा बँक रस्ता तुंबलेल्या गटारीच्या दुरुस्ती आणि सफाईनंतर आता वाहतुकीसाठी पूर्ववत सुरु करण्यात आला आहे . आमदार मंगेश चव्हाण आणि भाजप कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेने मैदानात उतरून हे काम ३ दिवसात पूर्ण केले.


शहरातील वर्दळीच्या शिवाजी चौक ते घाटरोड मार्गावरील बडोदा बँकेसमोरील ४० वर्ष जुनी गटार ब्लॉक झाल्याने पावसाचे पाणी तुंबून तलाव साचत होता. यामुळे वाहनधारकांचे छोटे मोठे अपघात होत होते. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने गटारींतील कचरा काढण्यात येऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली या दुरुस्तीसाठी दोन दिवस या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली मात्र जवळपास 10 फूट खोल व 6 फुट रुंद असलेली 40 वर्ष जुनी गटार साफ करण्यासाठीच 2 दिवस वेळ गेल्याने शहरात वाहतूक कोंडीचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजप लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कामाला लागले होते.

सलग 3 दिवस व 3 रात्र स्वतः उभे राहून त्यांनी रस्त्याचे काम पूर्ण केल्याने आज शिवाजी चौक ते बडोदा बँकेचा रस्ता शहरवासीयांसाठी खुला करण्यात आला. मुसळधार पाऊस पडल्यानंतरदेखील पाणी तुंबले नाही गटारीतुन सर्व पावसाचे पाणी वाहून गेले. वाहनधारकांना सर्वात डोकेदुखी ठरणारा हा भाग दुरुस्त झाल्याने वाहनधारकांची मोठी सोय झाली आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टप्प्याटप्प्याने शहरातील इतर रस्तेदेखील दुरुस्ती केली जाणार आहे.







